मुंबई दि. २० जून — भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारतीय बौद्ध महासभेचे नेते भीमराव यशवंत आंबेडकर यांनी आज जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांची विशेष भेट घेतली. या ऐतिहासिक प्रसंगी त्यांनी दलाई लामांना बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती भेट स्वरूप दिली. या भेटीत सुमारे १० मिनिटांचा शांत, अर्थपूर्ण व प्रेरणादायी संवाद घडला.

या भेटीचा उल्लेख करताना भीमराव आंबेडकर म्हणाले, “हा संवाद आयुष्यभर लक्षात राहणारा आहे. आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेला धम्ममार्ग समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतो, त्याची माहिती दलाई लामांना दिली आणि त्यांनी आमच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.”
दलाई लामा आणि आंबेडकर कुटुंबाचा ऋणानुबंध
विशेष म्हणजे दलाई लामा आणि आंबेडकर कुटुंबाचा अनेक दशकांपासून स्नेहसंबंध राहिला आहे. त्यांनी नेहमीच आंबेडकर कुटुंबाला मान-सन्मान दिला आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या अधिवेशनासाठी मुंबईतील दादर चैत्यभूमीवर दलाई लामा आले होते. एवढेच नव्हे, तर एकदा ६ डिसेंबरला चैत्यभूमीला भेट देऊन दलाई लामांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीनुसार व्यासपीठावरून भाषण केले होते. त्या वेळी त्यांनी तिबेटी भाषेतून भाष्य करत बौद्ध धम्म आणि बाबासाहेबांच्या कार्याचे कौतुक केले होते.

याशिवाय, शेंडी-भंडारदरा येथे बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी दलाई लामा आले होते. त्यानंतर नाशिकमध्येही त्यांनी बौद्ध समाजाशी संवाद साधला होता. त्यांच्या या दौऱ्यांमुळे महाराष्ट्रातील बौद्ध समाजाला प्रचंड ऊर्जा व प्रेरणा मिळाली होती.
दलाई लामा कोण आहेत?
दलाई लामा हे तिबेटी बौद्ध धर्मातील सर्वोच्च धर्मगुरू असून, शांतता, करुणा आणि मानवतेचा जागतिक संदेश देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सध्या १४ वे दलाई लामा तेनझिन ग्यात्सो या पदावर आहेत. नोबेल शांतता पुरस्कार विजेते असलेल्या दलाई लामांनी निर्वासित जीवन स्वीकारून भारतात राहात, जगभर बौद्ध धम्म व मानवतावादाचा प्रसार केला आहे.
धम्मसेवेच्या प्रवासात ऐतिहासिक टप्पा
ही भेट केवळ वैयक्तिक नव्हे, तर धम्मसेवेच्या जागतिक प्रवासातला एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं भीमराव आंबेडकर यांनी सांगितलं. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून देशभर आणि विदेशात बौद्ध धम्माचा प्रचार व बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा जागर केला जात आहे.