चिमूर (जिल्हा चंद्रपूर), दि. ९ जुलै २०२५चिमूर तालुक्यातील चिमूर-भिसी-शंकरपूर या मुख्य मार्गाचे बांधकाम झाल्याला अवघे पाच वर्षेच झाली असताना देखील, रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले असून, त्यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत.

या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असून, नुकत्याच घडलेल्या एका अपघातात ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अशा खड्ड्यांमुळे दररोजच प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असून, “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.

ह्या गंभीर समस्येकडे चिमूर विधानसभेचे आमदार मा. बंटी भांगडिया व स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याची टीका केली जात आहे. जर रस्त्याच्या बांधकामाच्या वेळी जनप्रतिनिधी व प्रशासनाने योग्य लक्ष दिले असते, तर असे निकृष्ट दर्जाचे काम झाले नसते आणि निष्पाप नागरिकांचे जीव गेले नसते, असे स्थानिक जनतेचे मत आहे.तत्काळ या महामार्गाचे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन नागरिकांना होणारा त्रास आणि संभाव्य जीवितहानी थांबवावी, अशी जोरदार मागणी आता जनतेकडून केली जात आहे.
प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा
डाॅ. बाळासाहेब बन्सोड – चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी