
बदलापूर प्रतिनिधी – विजय धोंडीराम गायकवाड
बदलापूरमध्ये घरासमोर पार्क केलेल्या दुचाकींच्या चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा उफाळा घेतला असून, नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत एरंजाड परिसरातील श्रीजी निसर्ग, कृष्णाधाम व इतर भागात चोरीच्या मालिकाच सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असली तरी त्याच रात्री दुसऱ्या टोळीने ‘सिनेस्टाईल’ पद्धतीने चोरी करत पोलिस व्यवस्थेचे आव्हान उभं केलं आहे.
प्रकरण १ – दुचाकी व दागिने चोरी (गु.र.क्र. 259/25, 260/25)
दि. ५ ते ६ जुलैच्या रात्री, रमेश हरी मेहर (वय 53, रा. एरंजाडगाव) यांच्या घरासमोरून पल्सर 135 व होंडा SP शाईन या दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या. तसेच निलेश जनार्धन मेहेर (वय 39, रा. नेहा सदन, एरंजाड) यांच्या घरातून ५ हजारांचे मंगळसूत्र व २० हजार रुपये रोख चोरीस गेले.
गुन्हे शोध पथकाचे PSI अशोक पाथरे हे गस्त घालत असताना, बोराडपाडा चौफुलीवर एका संशयितास अडवले. त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे प्रकाश विश्वनाथ गिरे (वय 23, रा. मुंब्रा, ठाणे) याला अटक करण्यात आली असून, त्याने चोरीची कबुली दिली आहे.
प्रकरण २ – कृष्णाधाम परिसरात दुचाकी चोरी (गु.र.क्र. 263/25)
दि. १० जुलै रोजी पहाटे ३ वाजता, कृष्णाधाममधील विश्वास शांताराम गायकर (वय 38) यांच्या दोन दुचाकी चोरीला गेल्या. चोरट्यांनी 2018 च्या होंडा कंपनीची व 2016 मॉडेलची काळ्या रंगाची दुचाकी अनुक्रमे १० व ७ हजार रुपये किंमतीच्या चोरल्या. याप्रकरणाचा तपास पो.नि. अनिल थोरवे व पो.उ.नि. पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. शेख आणि पो.ना. पादीर करत आहेत.
प्रकरण ३ – श्रीजी निसर्गमधील ‘सिनेस्टाईल’ चोरी
दि. १० जुलै रोजी पहाटे ३.३० वाजता सुमारे १० चोरट्यांची टोळी श्रीजी निसर्ग सोसायटीत मागच्या भिंतीवरून चढून शिरली. अवघ्या ३० मिनिटांत त्यांनी बिल्डिंग नं. २ व ३ मध्ये प्रवेश करून चोरी केली. याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली नाही. सदरची घटना परिसरातील रहिवाशांच्या ग्रुप मधून वाचकास दिली आहे
गस्तेवर प्रश्नचिन्ह – नागरिक संतप्त.
घटनाकाळात एरंजाड नाकाबंदी, नगरपालिका शाळा व सोनिवली शाळा परिसरात गस्त सुरू होती का, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. चोरीच्या बऱ्याच ठिकाणी गस्त पॉईंट असूनही अशा घटना घडल्याने पोलिसांवर नागरिकांचा रोष वाढला आहे. तपास सुरू असल्याची माहिती दिली जात आहे, मात्र घटनांची गंभीरता पाहता ठोस कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्वयंस्फूर्तीने सुरक्षा बैठक – श्रीजी स्कवेअरचा पुढाकार
या पार्श्वभूमीवर श्रीजी स्कवेअरमध्ये विशेष सुरक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्री गस्त व अधिक सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार आहे.
नागरिकांसाठी सूचना:
आपली वाहने योग्यरित्या लॉक करून CCTV असलेल्या सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत.
अनोळखी व्यक्ती, संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलीसांना माहिती द्यावी.
सोसायटीमधील सुरक्षा यंत्रणा (CCTV, गार्ड) नियमित तपासाव्यात.
एकत्र येऊन गस्त, सुरक्षा बैठक व आपत्ती व्यवस्थापन प्रणाली मजबूत करावी.
बदलापूर पोलिसांकडून सखोल तपास अपेक्षित असून, चोरट्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे.