पुणे | दिनांक १३ जुलै २०२५ — प्रकाश पर्व न्यूज – आवाज वंचित बहुजनांचा या डिजिटल पोर्टलतर्फे पुणे येथे एक दिवसीय भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून, तालुक्यांतून, खेड्यापाड्यांतून आणि शहरी भागातून प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्यशाळेचा मुख्य उद्देश नवनियुक्त प्रतिनिधींना पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांची आणि बातमी लेखनशैलीची माहिती देणे हा होता. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन मुख्य संपादक अजय जाधव सर यांनी केले. त्यांनी बातमी कशी तयार करावी, बातमीचे स्वरूप कसे असावे, माहिती संकलन करताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात, अशा अनेक मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले

सहसंपादक सागर रोकडे सर यांनी “एक आदर्श पत्रकार कसा असावा” याविषयी उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधला, तर कार्यकारी संपादक संदेश भालेराव सर यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत आपल्या अनुभवातून शिकवले. आजारी असतानाही दोन्ही संपादक कार्यशाळेसाठी उपस्थित राहिले आणि मार्गदर्शन केले, ही बाब सर्व उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन जिल्हा प्रतिनिधी विशाल गायकवाड यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले, तर पुणे प्रतिनिधी रोहित कांबळे सरांनी या भव्य कार्यशाळेत घेतलेल्या मेहनती बद्दल त्यांचे आभार सर्व संपादक मंडळाने मानले व शुभेच्छा दिल्या. सुहास महाडिक सर व इतर प्रतिनिधींनीही अत्यंत मोलाचे योगदान दिले.कार्यशाळेच्या शेवटी काही निवडक प्रतिनिधींना बातमी प्रकाशित करण्याचा अधिकार देण्यात आला. त्यांनी हा जबाबदारीचा मान स्वीकारत इतर प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्याचे व्रत स्वीकारले.

विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी रितेश नामदेव साबळे यांची पत्रकारिता क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य, निष्ठा आणि गुणवत्ता लक्षात घेऊन सर्व सहकाऱ्यांच्या संमतीने त्यांची “हेड ऑफ मॅनेजमेंट” या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली. कार्यशाळेदरम्यान त्यांना अधिकृतरित्या नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
आपल्या मनोगतात रितेश साबळे यांनी सर्वांचे आभार मानत सांगितले की, “मी या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या प्रत्येक प्रतिनिध्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहीन.” त्यांनी प्रतिनिधींशी सतत संपर्कात राहण्याचे वचन दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकारी संपादक आदरणीय संदेश भालेराव साहेबांनी काही पुस्तके भेट म्हणून वाटप केले डॉ. बाळासाहेब बन्सोड सर यांनी प्रेरणादायी गीत सादर केले आणि उपस्थित प्रतिनिधींना नवी ऊर्जा देऊन कार्यशाळेचा समारोप केला.
ही एक दिवसीय कार्यशाळा केवळ प्रशिक्षण नव्हे, तर एक चळवळ होती — दबलेल्या, वंचितांच्या हक्काचा आवाज बुलंद करण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार या माध्यमातून तयार झाला.
