बदलापूर – प्रतिनिधी विजय धों. गायकवाड
अहमदाबाद येथे नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी विमान अपघातात बदलापूर पूर्व येथील रहिवासी आणि 11 वर्षांपासून केबिन क्रू म्हणून कार्यरत असलेले दीपक पाठक (वय अंदाजे ३५) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण बदलापूर परिसरात आणि त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे.
दीपक पाठक हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे गावचे रहिवासी होते. अभ्यासू, नम्र व कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व असलेले दीपक गेल्या काही वर्षांपासून आपल्या पत्नी व कुटुंबासोबत बदलापूर पूर्व येथील रावळ कॉम्प्लेक्स, कात्रप रोड येथे राहत होते. चार वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीचे माहेर देखील नैताळे गावातच आहे.

हवाई सेवेत त्यांनी अकरा वर्षांची उल्लेखनीय सेवा दिली. त्यांचा अकस्मात मृत्यू ही एक मोठी पोकळी निर्माण करणारी घटना आहे, असे त्यांचे सहकारी सांगतात.
अंत्ययात्रेची माहिती:📅 शनिवार, २१ जून २०२५🕛 दुपारी १२.०० वाजता🏠 F/9, रावळ कॉम्प्लेक्स, कात्रप रोड, रुचिता हॉटेलजवळ, बदलापूर (पूर्व) – 421503
त्यांच्या अंत्ययात्रेसाठी नातेवाईक, मित्र, हवाई क्षेत्रातील सहकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

त्यांचे निकटचे सविता बाविस्कर व राजेंद्र बाविस्कर या दाम्पत्याने हळहळ व्यक्त करताना सांगितले की, “दीपकच्या अचानक जाण्याने आम्ही सुन्न झालो आहोत.”यावेळी दत्ता गायकवाड, आनंद सोनकांबळे सर, नवनीत तायडे, प्रताप नितीनवरे,रमेश कांबळे, बी. एल. सावंत यांनी देखील भावपूर्ण श्रद्धांजली वाहत म्हटले की –”तुझ्या आकस्मिक जाण्याने आम्ही सर्वच निशब्द झालो आहोत, दीपक!”