प्रतिनिधी – रामचंद्र नावकार, बाळापूर तालुका
बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बु. गावातील नागरिकांना दररोज रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेला सामोरे जावे लागत आहे. गावातील मुख्य रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, त्या रस्त्यावरून पायी चालणे देखील कठीण बनले आहे. साचलेल्या पाण्यामुळे व चिखलमय रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
या रस्त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत असून, हा मार्ग गावासाठी प्रमुख संपर्कमार्ग आहे. मात्र पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचून चिखल साचतो, परिणामी वृद्ध, महिला, लहान मुले, शेतकरी व कामगार वर्गाला ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात सर्प, धामण, विंचू, काटा यांसारख्या विषारी प्राण्यांचं प्रमाण वाढत आहे, त्यामुळे अपघात किंवा विषबाधेची शक्यता देखील वाढली आहे.

गावकऱ्यांनी अनेक वेळा ग्रामपंचायतकडे तक्रारी केल्या असूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्थानिक प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “रोजचा प्रवास आमच्यासाठी संकट बनलाय, लहान मुलांना शाळेत पाठवतानाही धाकधूक वाटते,” असे एका ग्रामस्थाने सांगितले.
ग्रामस्थांनी शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे विनंती केली आहे की, या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण किंवा खडीकरण करून गावकऱ्यांना दिलासा द्यावा.
