दि. ०९ जुलै २०२५ | चंद्रपूर प्रतिनिधी : बाळासाहेब बन्सोड
वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मा. सौ. कविताताई गौरकर यांच्या नेतृत्वात गांधी चौक, चंद्रपूर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा केंद्र सरकारने बांधकाम मजुरांच्या विरोधात पारित केलेल्या चार काळ्या कायद्यांच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

या कायद्यांमुळे बांधकाम मजुरांवर अन्याय होत असून, त्यांचा शोषण होतो आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून बांधकाम मजुरांना न्याय मिळावा, या उद्देशाने वंचित बहुजन महिला आघाडीने रस्त्यावर उतरून संघर्ष केला.
मोर्चा गांधी चौकातून सुरू होऊन शहरातील मुख्य रस्त्यांवरून नारेबाजी व घोषणांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

या वेळी वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे संयुक्त शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सादर केले. शिष्टमंडळात प्रमुख म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा मा. सौ. कविताताई गौरकर, वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर (पूर्व) महासचिव मा. मधुभाऊ उराडे, तसेच दोन्ही संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या धडक मोर्चामध्ये विविध ज्वलंत मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच एका सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला मा. कविताताई गौरकर, मा. मधुभाऊ उराडे यांच्यासह इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
सभेचा समारोप सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आला. मोर्चात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला आणि प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नांकडे वेधण्यात वंचित बहुजन महिला आघाडीला यश मिळाले.
प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा