
बदलापूर (प्रतिनिधी – विजय धों. गायकवाड)
बदलापूर शहरात विकासकामांची आश्वासनं नेहमीच मोठ्या आवाजात दिली जातात, मात्र प्रत्यक्षात लोकजीवनाला असलेला धोका मात्र स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अधिकच वाढला आहे. भारत कॉलेजजवळ, हेंद्रेपाडा परिसरात असलेल्या गटारावर झाकणच नाही. त्यामुळे ते ठिकाण सध्या अपघाताचे ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे.
या गटारात पडून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली असून, विशेषतः वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी हे ठिकाण मृत्यूचा सापळा ठरू शकतो. या ठिकाणी थोडासा अंधार, थोडीशी असावधता, किंवा पावसात पाणी साचल्यास कोणाचाही जीव गमवावा लागू शकतो.
“मुख्याधिकारी साहेब… कृपया टॅक्स भरणाऱ्या नागरिकांच्या जीवीताचे रक्षण करा. आपण थोडं याकडे लक्ष द्या आणि नागरिकांचा जीव वाचवा.”
अशी विनंती दत्ताभाऊ गायकवाड (वंचित बहुजन आघाडी, बदलापूर) यांनी प्रशासनाकडे केली आहे.
शहरातील नागरिक वेळेवर कर भरतात, त्यांचे मूलभूत अधिकार म्हणजे सुरक्षित रस्ते, झाकलेली गटारे, स्वच्छ परिसर. मात्र, या परिसरात गटार उघडं असणं हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करतं.
या ठिकाणी कोणी गंभीर जखमी झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा, प्रशासनाने वेळेवर उपाय करणे ही जबाबदारी आहे. या ठिकाणी तातडीने झाकण बसवण्यात यावे, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे.
शहरात फक्त घोषणा नकोत, कृती हवी!
विकासकामांचा डंका वाजवणाऱ्या प्रशासनाने नागरिकांच्या जिवावर उठलेली संकटं आधी मिटवावीत, हीच अपेक्षा!
