तिर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीच्या शांततामय मागणीवरून तिर्थपुरी येथे निर्माण झालेल्या वादात स्थानिक पोलिस प्रशासनाने 10 भीमसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज तिर्थपुरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने आलेल्या भीमसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला.

सदर वादाची पार्श्वभूमी अशी की, तिर्थपुरी येथे बसस्टँडजवळील स्मशानभूमीच्या शेजारील गार्डनसाठी राखीव जागेवर जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत परवानगी घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, या पुतळ्याच्या विरोधात स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी बप्पा बहीर (रा. एकलहरा, ता. अंबड) यांच्या नावे जमीन दाखवून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. या गुन्ह्यांमध्ये एक व्यक्ती ३५ वर्षांपूर्वी मृत आहे आणि दुसरा नाबालिग असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला आहे.

या प्रकाराची चौकशी न करता थेट गुन्हे दाखल करणारे एपीआय साजिद अहमद यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. पुतळ्याजवळून निघालेल्या या मोर्चात आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात फलक, बॅनर, झेंडे घेऊन “जय भीम” च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
एपीआय साजिद अहमद यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी.
बप्पा बहीर आणि साजिद अहमद यांनी संगनमताने १० भीमसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याने दोघांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा.
सर्व खोटे गुन्हे मागे घ्यावेत.

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे तालुका कोषाध्यक्ष अतिष वानखेडे यांनी केले. त्यांच्यासोबत अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते, त्यामध्ये:
मा. दिपकजी डोके (मराठवाडा उपाध्यक्ष)
मा. परमेश्वर खरात (कार्याध्यक्ष, जालना)
मा. सतीशराव खरात (जिल्हा उपाध्यक्ष)
मा. सुभाषराव ससाणे (जिल्हा प्रवक्ते)
मा. बळीराम तात्या खटके (विधानसभा उमेदवार)
मा. देविदास कोळे (जिल्हा महासचिव)
मा. समाधान तोडके (ता. अध्यक्ष, घनसावंगी)
मा. किशोर तुपे (ता. अध्यक्ष, अंबड)
मा. राजु शरणांगत (ता. उपाध्यक्ष, घनसावंगी)
मा. बाबासाहेब गालफाडे, बाळासाहेब सोनवने (महासचिव)
मा. गौतम पटेकर (प्रसिद्धी प्रमुख)
संतोष येडे, सुधीर शरणांगत आणि इतर कार्यकर्ते
तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे पोलिस प्रशासनाची एकच धांदल उडाली. अखेरीस पोलीस निरीक्षकांनी आंदोलकांशी चर्चा करत मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठवण्याचे आश्वासन दिले. मात्र, आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला की मागण्या मान्य न झाल्यास पुढील टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात येईल.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही भीमसैनिकांवर गुन्हे दाखल झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची लोकशाही मार्गाने करण्यात आलेली मागणी दडपण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे.”

रिपोर्टर: रामकिसन अवधूतप्रतिनिधी – अंबड तालुका, प्रकाशपर्व न्यूज