बदलापूर | विजय धो. गायकवाड – प्रतिनिधी, प्रकाशपर्व न्यूज
कल्याण ते बदलापूरदरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या रेल्वे प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, प्रवाशांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. हा प्रकल्प मुंबई उपनगरी रेल्वेमार्गासाठी अत्यंत आवश्यक असूनही अद्याप केवळ ३० टक्केच काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांत केवळ पाच टक्केच प्रगती झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अपेक्षांना आणि संयमाला तडा जात असून, संताप वाढत आहे.
बदलापूर आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील हजारो प्रवासी दररोज अप-डाउन करत असताना वेळेचा अचूक अंदाज नसणे, गाड्यांच्या विलंबामुळे होणारे नुकसान आणि असह्य गर्दी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. या मार्गिकेचे काम पूर्ण झाले तर लोकलसाठी स्वतंत्र ट्रॅक तयार होतील. त्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये होणारी अडचण टळून रेल्वे वाहतुकीचे नियमन सुकर होईल. यामुळे हजारो प्रवाशांचे जीवन थोडे सुसह्य होईल.
वंचित बहुजन आघाडीचे बदलापूर येथील नेते दत्ता गायकवाड यांनी या विषयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “या प्रकल्पाच्या कामात होत असलेली उदासीनता सामान्य प्रवाशांसाठी गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. ही कामे केवळ सुविधा वाढवणारी नाहीत, तर आता ती गरज बनली आहे.”

तसेच, त्यांनी केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडे या प्रकल्पास तातडीने गती देण्याची ठोस मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही कामे २४x७ पद्धतीने चालवून प्रकल्पाचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.
अलीकडेच दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान एका प्रवाशाचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना सर्व रेल्वे यंत्रणेसाठी एक wake-up call आहे, असे दत्ता गायकवाड यांनी म्हटले. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी आणि सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचे काम तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
कल्याण–बदलापूर मार्गिकेचा विस्तार ही केवळ वाहतुकीसाठी नसून, सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही कामे प्राधान्याने पूर्ण झाली पाहिजेत, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आता केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष पावले उचलण्याची वेळ आली आहे.

प्रकाशपर्व न्यूज या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचा आवाज पोहोचविण्याचा आणि सामान्य प्रवाशांच्या हक्कासाठी प्रश्न उभा करण्याचा प्रयत्न सुरूच राहील.



