बदलापूर प्रतिनिधी – विजय धों. गायकवाड
बदलापूर शहरातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी शौचालयाच्या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने कु.न.प.च्या हद्दीतील चौकाचौकांत मुक्त शौचालय उपलब्ध करून द्यावेत, यासाठी बदलापूर नगरपरिषदेला लेखी निवेदन दिले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता बाबू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, बदलापूर शहरात सामान्य नागरिकांसह महिलांना, वृद्धांना, विद्यार्थ्यांना आणि शहरामध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक शौचालयांची गैरसोय भासते. काही ठिकाणी शौचालये असली तरी ती वापरण्यायोग्य नाहीत किंवा बंद अवस्थेत आहेत.
या समस्येमुळे नागरिकांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः महिलांना व विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, बस स्थानके, रेल्वे स्थानक परिसर, तसेच नागरिकांच्या गर्दीच्या ठिकाणी तत्काळ सार्वजनिक व स्वच्छतागृहांची उपलब्धता सुनिश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दत्ता गायकवाड यांच्या स्वाक्षरीनिशी नगरपरिषदेला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली आहे.
शहराच्या स्वच्छता व नागरी सोयीसुविधांच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीची ही मागणी अत्यंत महत्वाची मानली जात असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.