अकोट ( तालुका प्रतिनिधी) साक्षी थोरात – अकोट शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अवघ्या ९ वर्षांचा दर्शन वैभव पळसकर याची त्याच्याच सावत्र वडिलांनी निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दर्शनचा अचानक बेपत्ता झाल्याचा प्रकार काल दुपारी घडला होता. मुलगा सापडत नसल्याने त्याची आईने तात्काळ अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर अकोट पोलिसांनी शोधमोहीम राबवत सखोल तपास सुरू केला. या तपासात धक्कादायक बाब उघडकीस आली की, दर्शनची हत्या ही त्याच्याच सावत्र बापाने केली आहे. हत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस तपास सुरु आहे.
ही घटना संपूर्ण अकोट शहराला हादरवून टाकणारी असून समाजात सावत्र नात्यांमधील वाढती क्रूरता आणि मुलांवरील अत्याचारांचे हे आणखी एक भीषण उदाहरण ठरले आहे.
दर्शनला न्याय मिळालाच पाहिजे!
अशा अमानुष आणि पाशवी वागणुकीस जबाबदार असणाऱ्या सावत्र बापावर कडक कारवाई होणे अत्यावश्यक आहे. अकोटकरांसह सर्वच नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून दोषी व्यक्तीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.




