
आज आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करत असलेल्या या दिवशी एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रसंग घडला होता. बौद्ध परंपरेनुसार, याच आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी पहिला उपदेश – “धम्मचक्कप्पवत्तन सुत्त” पंचवर्गीय भिक्खूंना दिला. म्हणूनच या दिवशी गुरुपौर्णिमा म्हणून ओळख मिळाली.
भगवान बुद्धांनी बोधीप्राप्तीनंतर पहिला वर्षावास सारनाथ (इसिपतन मिगदाय) येथे केला. याच ठिकाणी त्यांची भेट त्यांना पूर्वी सोडून गेलेल्या पंचवर्गीय भिक्खूंशी झाली. बुद्धांच्या उपदेशाने प्रेरित होऊन त्यांनी संघात प्रवेश केला आणि त्यांच्यासह पहिला बौद्ध संघ स्थापन झाला. या दिवशी धम्म – संघ – बुद्ध या त्रिरत्नांचे महत्त्व स्पष्ट झाले.
धम्मचक्कप्पवत्तन सुत्त
बुद्धांनी दिलेला पहिला उपदेश “धम्मचक्कप्पवत्तन सुत्तं” आजही पालि त्रिपिटकातील संयुत्त निकायातील सच्चसंयुत्तंमध्ये स्पष्टपणे उल्लेखित आहे.
सच्चसंयुत्तं > धम्मचक्कप्पवत्तन वग्गो > धम्मचक्कप्पवत्तन सुत्तं हे त्या ग्रंथातील पहिले सुत्त मानले जाते.
पहिला वर्षावास आणि संघ विस्तार
या पहिल्या वर्षावासात भगवान बुद्धांशिवाय ६० अर्हत निर्माण झाले. बुद्धांनी त्यानंतर या ६० अर्हत भिक्खूंना वेगवेगळ्या दिशांना धम्म प्रचारासाठी पाठवले. हा काळच ‘वर्षावास’ म्हणून ओळखला जातो – आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा.
बुद्धांचा संघ नंतर गया, राजगृह, वैशाली आणि उरुवेला येथे गेला. उरुवेला येथे कश्यप बंधूंनी व त्यांच्या शिष्यगणांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला. बुद्धांनी अनेक उपदेश या काळात दिले. आदित्तपरियाय सुत्तं, रतनसुत्तं यासारखे सुत्ते त्यांच्या दयाळूपणाचा आणि बौद्ध धर्माच्या विस्ताराचा पुरावा आहेत.
गुरुपौर्णिमेचा बौद्ध अर्थ
आज गुरुपौर्णिमा साजरी करताना आपण बौद्ध परंपरेतील या दिवशीची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे आहे. भगवान बुद्ध हेच जगातील पहिले गुरु – ज्यांनी अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचे चक्र फिरवले आणि मानवजातीला धम्माचा मार्ग दाखवला.
त्यामुळेच हा दिवस “धम्मचक्कप्पवत्तन दिन” म्हणून ओळखला जातो आणि बुद्धांच्या उपदेशामुळेच या पौर्णिमेला “गुरुपौर्णिमा” ही ओळख प्राप्त झाली.
लेखक – अतुल भोसेकर
संकलन – विशाल साहेबराव गायकवाड
प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा