दिनांक : १४ जुलै २०२५
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी : जनार्धन खरात
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्यातील मंगळवार पेठ येथे भव्य स्मारक उभारावे, या प्रमुख मागणीसाठी “स्मारक कृती समिती, पुणे” यांच्या वतीने आज पुण्यातील विधान भवनावर जोरदार जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

या आंदोलनास भीमा कोरेगाव स्तंभ संरक्षण समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन विस्तारीकरण समिती, पुणे यांनी ठाम पाठिंबा दर्शविला. आंदोलनाच्या वेळी विविध नेत्यांनी आपल्या भाषणांद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेतले.
नेत्यांनी आपल्या भाषणात म्हटले की,
“पुणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि बौद्धिक चळवळीचे केंद्र आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी त्यांचे भव्य व समर्पक स्मारक उभारणे ही सरकारची नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे.”
स्मारक कृती समितीने खालील तीन प्रमुख मागण्या सरकारपुढे ठामपणे मांडल्या :
मंगळवार पेठेतील जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी तातडीने आरक्षित करावी
स्मारकासाठी स्वतंत्र व विशेष निधी जाहीर करावा
स्मारकाच्या कामास त्वरित सुरुवात करावी
या आंदोलनाच्या माध्यमातून स्मारकासाठी जनतेच्या भावना आणि शासनाची जबाबदारी यावर ठामपणे प्रकाश टाकण्यात आला.
