
कंधार दि.१४ (ता. प्र.) बालाजी गायकवाड
कंधार पंचायत समितीच्या घरकुल विभागात अनागोंदी कारभाराने कळस गाठला असून घरकुलाचे बिल अदा करण्याच्या कामात अंदाधुंदी माजून लाभधारकांना बेसुमार लुटण्याचा धंदा जोमात सुरू आहे.प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत ज्या लाभधारकांनी घरकुलाचे काम पूर्ण केले अशांना बिल मिळत नाही,परंतु काहीच काम न करता काम अपूर्ण असतानाही मलिदा घेऊन कर्मचारी मेहरबान झाल्याचे दिसून येत आहे.विशेषता ज्यांनी पक्के घर काही वर्षांपूर्वीच बांधलेले आहे.अशा व्यक्तींनाही घरकुलाचा लाभ देण्याचा प्रताप संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे.त्यामुळे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी याकडे जातीने लक्ष देऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी.अशी मागणी लाभार्थ्याकडून केली जात आहे. कंधार पंचायत समिती घरकुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अंदाधुंद माजवित कंधार तालुक्यातील ग्रामीण घरकुल लाभधारकांना बेसुमार लुटण्याचा धंदा सुरू केला आहे.अगोदरच घरकुलासाठी शासनाची तोकडी मदत मिळते त्यात लाभधारकांना बांधकाम करावे लागते.घरकुल मंजूर करण्यासाठी गावातील सरपंच आणि ग्रामसेवक यांची मनधरणी करावी लागते.घरकुल मंजूर झाल्यानंतर कंधार पंचायत समितीच्या घरकुल विभागाच्या संगणक परिचालक प्रदीप पवार,अभियंता माने,कारकून खरात यासह अन्य कर्मचाऱ्याकडून पाच हजार रुपये प्रमाणे तीन टप्प्यात म्हणजेच एकूण १५ हजार रुपये लाभार्थ्यांना मागितले जातात.रुपये दिल्यानंतरच घरकुलाचे बिल खात्यात जमा केले जाते.ज्यांनी घरकुलाचे भूमीपूजनही केले नाही अशा लाभधारकांचे पुर्ण बिल अदा करण्यात आले आहे.मात्र ज्या लाभधारकांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले अशांना उलट विविध कारणे सांगुन बिल त्यांच्या खात्यात जमा केले जात नाही.तालुक्यातील फुलवळ, शेकापूर,बोरी खुर्द,दहीकळंबा या गावामध्ये अनेक जणांनी काही वर्षापूर्वी पक्के घर बांधलेले असतानाही त्या घरांना घरकुल योजनेमध्ये दाखवून मलिदा लाटण्याचा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गोरख धंदा झपाट्याने सुरू आहे.अशा मुजोर बेजबाबदार घरकुलाच्या कामात कार्यरत असणारे संगणक परिचालक प्रदीप पवार,अभियंता माने,कारकून खरात यासह अन्य कर्मचारी,सर्व अभियंता यांची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.अशी मागणी खऱ्या लाभार्थ्यामधून केली जात आहे.