प्रतिनिधी – सुहास महाडिक. पुणे शहर
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या नावाने फेसबुकवर एक फेक आणि अनधिकृत अकाउंट चालवले जात असून, या माध्यमातून लोकांची दिशाभूल आणि फसवणूक केली जात असल्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज सायबर क्राईम ब्रांच, शिवाजीनगर, पुणे येथे धाव घेतली.
या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत फेक फेसबुक अकाउंट तत्काळ बंद करण्याची आणि संबंधित अज्ञात इसमावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम १९६, १९७ आणि ३१८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती देताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर फेक अकाउंट तयार केले आहे. या फेक अकाउंटवर त्यांच्या मूळ नावाचा आणि फोटोचा वापर करून जनतेमध्ये भ्रम निर्माण केला जात आहे.
या अकाउंटवरून सुजातदादांच्या नावाने लोकांकडून मेसेजद्वारे आर्थिक मदतीची मागणी केली जात असून, काही ठिकाणी “५ लाख ६७ हजार रुपये मिळाल्याबद्दल धन्यवाद” असे मेसेज देखील पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक सामान्य लोक फसवले गेले असण्याची शक्यता आहे.

या फसवणुकीच्या प्रकाराबाबत विश्वासार्हता वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सायबर क्राईम ब्रांचला खालील पुरावे लेखी स्वरूपात सादर केले:
1. सुजात आंबेडकर यांचे नाव आणि फोटो असलेले फेक फेसबुक अकाउंटचा स्क्रीनशॉट
2. त्या फेक फेसबुक अकाउंटची लिंक
3. लोकांकडून पैसे मागितल्याचे फेक मेसेजचे नमुने
4. ५,६७,०००/- रुपये मिळाल्याबद्दल धन्यवाद अशी फेक पोस्ट
या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम १९६, १९७ व ३१८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि फेक अकाउंट तातडीने बंद करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. याबाबत संबंधित कागदपत्रांची प्रत सुद्धा निवेदनासोबत जोडण्यात आली आहे.
ही तक्रार सादर करताना वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुणे शहर आणि विधानसभा कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. त्यामध्ये प्रमुख उपस्थित कार्यकर्ते:
सागर भाऊ आल्हाट, नितीन कांबळे, सुहास महाडिक, शिवा डावरे, अमर सावंत, श्रीकांत चौगुले, अरुण काका इंगळे, रक्षणी शेंडकर, सुमित हाताकळे, अविनाश लहाडे, विपुल सोनवणे, राहुल रिकीबे, गौतम तायडे, आनंद ढेंबरे, योगेश सुरवसे, किरण सैदाने आदींचा समावेश होता.
