दिनांक : ११ जुलै २०२५, पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे श्री. मेघराज अबादास पाटील (मु. पो. पळसदेव) यांनी काही सामाजिक व प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कांसाठी दिनांक ११ जुलै २०२५ पासून ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
पळसदेव गावात सराईत गुन्हेगार आप्पा शिंदे हा नागरिकांवर दहशत माजवत असून, तो गुंडगिरी करतो. २४ जुलै २०२४ रोजी श्री. मेघराज पाटील व श्री. भुषण काळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर सीआयडीमार्फत चौकशी करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
पालघर जिल्ह्यातील शासकीय जागांवरील अतिक्रमणे शासन निर्णय २०२२ नुसार अधिकृत करण्यात आली आहेत, त्याच धर्तीवर उजणी प्रकल्पग्रस्तांनी शासकीय जागांवर केलेली अतिक्रमणे अधिकृत करावीत.

प्रकल्पग्रस्त कुटुंबांची संख्या वाढल्यामुळे नवीन गावठाण मंजूर करून, प्रत्येक कुटुंबातील सदस्यास ४ गुंठेचा निवासी प्लॉट वितरित करण्यात यावा.
उजणी प्रकल्पग्रस्त पुनर्वसित गावठाणे व वनविभाग यांच्यामधील सीमारेषा ठरवून, ती कायम करण्यात यावी.
तसेच ही गावठाणे स्थानिक ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात यावीत आणि भूसंपादन अभिलेखांमध्ये यांची मालकी स्पष्टपणे नोंदवावी.
या उपोषणामध्ये अनेक पिडीत कुटुंबांनी सहभाग घेतला असून त्यामध्ये भुषण काळे, देविदास बांडे-कदम, स्वप्नील काळे, धिरज पाटील, बाबुलाल शेगर, अजिनाथ पवार, सागर कांबळे, तसेच वंचित बहुजन आघाडीचे पळसदेव अध्यक्ष आयु. अक्षय भोसले यांच्यासह संजय शेलार, बापू कुचेकर (लोणी), सोमनाथ कुचेकर, महेंद्र काळे, राजू शेगर, प्रकाश शेगर, व अनेक महिला सदस्यांचा समावेश आहे.
या उपोषणाला स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेल्फेअर कमिटी, दिल्ली (पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आयु. सागरभाऊ लोंढे) यांनी भेट देऊन आपला ठाम पाठींबा दर्शविला. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून त्वरित योग्य कारवाई करावी, अशी मागणी उपस्थित उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा
इंदापूर तालुका प्रतिनिधी : सागरभाऊ लोंढे