चंद्रपूर प्रतिनिधी
बाळासाहेब बन्सोड
चंद्रपूर : भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पूर्वच्या वतीने आषाढ पौर्णिमा (१० जुलै) ते अश्विन पौर्णिमा या काळात राबविण्यात येणाऱ्या वर्षावास धम्म प्रवचन मालेचा भव्य शुभारंभ एकाच दिवशी १५० बुद्ध विहारांमध्ये एकत्रितपणे करण्यात आला.
धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून वर्षावास काळात धम्म प्रवचन मालिका आयोजित करण्यात येते. यंदाही ही परंपरा कायम ठेवत भारतीय बौद्ध महासभेने चंद्रपूर जिल्हा पूर्वमधील आठही तालुक्यांमध्ये – गोडपिपरी, मुल, पोभुर्णा, सावली, सिंदेवाही, नागभीड, चिमूर आणि ब्रम्हपुरी – येथील सर्व बुद्ध विहारांमध्ये ही प्रवचन मालिका एकाच वेळी सुरू केली.
या उपक्रमाचा मुख्य उद्घाटन सोहळा बुद्धगिरी टेकडी, मुल येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष डॉ. राजपाल खोब्रागडे आणि आदरणीय विजयाताई रामटेके यांच्या हस्ते सकाळी १० वाजता संपन्न झाले. त्यानंतर संबंधित तालुक्यांमध्ये विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थानिक बुद्ध विहारांमध्ये प्रवचन मालेच्या उद्घाटनाचे कार्यक्रम पार पडले.
या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण १९ विविध विषयांवर केंद्रीय धम्म शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, विषयतज्ज्ञ तसेच तालुका स्तरावरील पदाधिकारी प्रवचन व मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे धम्म उपासक व उपासिकांना बुद्धांच्या शिकवणीची सखोल माहिती मिळून त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ. राजपाल खोब्रागडे, जिल्हा सरचिटणीस लोमेश खोब्रागडे, जिल्हा कोषाध्यक्ष घनश्याम भडके आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व धम्म अनुयायांना या प्रवचन मालीकेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

