अंबड (ता. अंबड, जि. जालना )प्रतिनिधी : रामकिसन अवधूत
दिः28 जून 2025 .
सुखापूरी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सध्या सुरू असून, या कामामुळे मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी वाहतुकीसाठी पर्यायी वळण रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र या वळण रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नसल्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.

वाहनचालकांना योग्य मार्ग माहीत नसल्यामुळे अनेकजण चुकीच्या रस्त्यावर वळतात, त्यामुळे वाहतुकीचा गोंधळ निर्माण होतो. काही ठिकाणी खोल खड्डे असून, अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी तर ही अडचण अधिक तीव्र होते, कारण रस्त्यावर कुठलीही प्रकाश व्यवस्था नाही. काही किरकोळ अपघात झाल्याचेही स्थानिकांनी सांगितले.

या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून घेतले असून, तातडीने दिशादर्शक फलक लावावेत आणि रस्त्याची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय, झालेल्या कामावर गेल्या आठ दिवसांपासून पाणी मारण्यात आलेले नाही, तसेच नियमांनुसार काम चालत नसल्याचीही चर्चा नागरिकांत सुरू आहे.
सदर विषयावर संबंधित यंत्रणांनी गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करावी, हीच सर्व नागरिकांची मागणी आहे.
प




