तालुका प्रतिनिधी कंधार बालाजी सुनील गायकवाड
शेकापूर गावाच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची उजळणी करणारा एक विशेष सोहळा नुकताच शेकापूर येथे पार पडला. महात्मा फुले जुनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष व माजी पंचायत समिती उपसभापती संभाजीराव नागोबा पाटील केंद्रे यांचा राज्य शासनाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण शेकापूर गाव एकत्र आले होते. गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि गावातील लहानथोर सर्वांनी फुलांच्या माळा अर्पण करून आणि पुष्पवृष्टीने केंद्रे साहेबांचे भव्य स्वागत केले. त्यांच्या सत्काराने गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद भानुदासराव गर्जे (व्हाइस चेअरमन, सेवा सहकारी सोसायटी) होते. प्रमुख अतिथी म्हणून सुंदर अक्षर कार्यशाळेचे दत्तात्रय येमेकर गुरुजी, शा. व्य. समिती तळ्याचीवाडीचे अध्यक्ष ओमकार गर्जे, महात्मा फुले शाळेचे प्राचार्य एम. पी. केंद्रे सर, सुपरवायझर लोंड सर, केदार सर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना संभाजीराव पाटील केंद्रे म्हणाले, > “१९७५ च्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी संघर्ष करत असताना मला तुरुंगवास सहन करावा लागला. त्या वेळेस माझ्यामध्ये एक धाडस आणि लोकशाही वाचवण्याची जिद्द होती. आजची तरुण पिढी हेच आदर्श समोर ठेवून चालली, तर नक्कीच देशातील गुलामीची चिन्हं नष्ट होतील.”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. यानंतर शाळेच्या वतीने केंद्रे साहेबांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संभाजीराव केंद्रे हे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या संघर्षमय जीवन प्रवासातून आजची पिढी खूप काही शिकू शकते.




