प्राचीन भारतातील महान सम्राटांपैकी एक म्हणजे सम्राट अशोक. मौर्य साम्राज्याचा हा पराक्रमी राजा इ.स.पू. २६८ ते २३२ दरम्यान गादीवर होता. त्यांच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्य भारताच्या बहुतेक भागावर पसरले होते. मात्र, कलिंग युद्धानंतर त्यांच्या जीवनात एक मोठा परिवर्तन घडले, ज्यामुळे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

कलिंग (आजचे ओडिशा) हे एक स्वतंत्र आणि समृद्ध राज्य होते. सम्राट अशोकाने ते जिंकण्यासाठी भीषण युद्ध छेडले. या युद्धात हजारो सैनिक आणि सामान्य नागरिक मृत्युमुखी पडले. युद्धानंतर अशोक जेव्हा रणांगणावर गेले, तेव्हा त्यांनी मृतदेहांचे ढिगारे आणि रक्ताने माखलेली भूमी पाहिली. या दृश्यामुळे त्यांच्या मनात प्रचंड खिन्नता निर्माण झाली.
अशोक म्हणाले, “जे मी केले ते पाप आहे. या हिंसाचाराचा शेवट हवा.”

या घटनेनंतर अशोकांनी बौद्ध भिक्षूंशी संवाद साधला. बौद्ध तत्वज्ञानातील ‘अहिंसा’, ‘करुणा’ आणि ‘समत्व’ या शिकवणींनी त्यांना भावले. त्यांनी स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला आणि अहिंसक मार्गाने राज्य चालवण्याचा निर्धार केला.
ते अनेक बौद्ध विहार, स्तूप आणि शिक्षणसंस्था बांधू लागले. जगभर बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी भिक्षूंना श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, आणि इतर देशात पाठवले. त्यांचे अशोकस्तंभ आणि शिलालेख आजही भारतभर आढळतात, जे त्यांच्या धम्मधारणेचा पुरावा आहेत.

सम्राट अशोक यांची ओळख ‘धम्मशोक’ या नावानेही होते. त्यांच्या काळात बौद्ध धर्माचा सुवर्णकाळ होता. त्यांनी दाखवलेल्या अहिंसेच्या आणि मानवतेच्या मार्गाने अनेकांनी प्रेरणा घेतली. आजही त्यांच्या कार्याचा आणि धम्म संदेशाचा जागतिक स्तरावर सन्मान केला जातो.

रोहित कांबळे प्रकाशपर्व न्यूज पुणे शहर



