वाळूज (औरंगाबाद) प्रतिनिधी | राजनगाव शेणपुंजी परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या “सोरट ” नावाच्या रोख पैशाच्या जुगारावर अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग व गुन्हे शाखेने बुधवारी सायंकाळी छापा टाकून १३ जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि ९ मोबाईल हँडसेट असा एकूण ४०,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस हवालदार लालखान पठाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही मोहीम राबविण्यात आली. सदर शेड हे अनुप पिंपळे यांच्या मालकीचे असून, सनी विजय पवार (रा. कमलापुर फाटा) यांच्या माध्यमातून तेथे पत्र्याच्या बॅनरवर ” सोरट अंदर-बाहर” नावाचा जुगार सुरु होता.
या कारवाईत दीपक गायकवाड, महेश मुकनर, राजेश निकळजे, मारोती डोंगरे, शिवाजी कदम, सुनील पतंगे, अविनाश चौधरी, गजानन मुखाडे, भीमराज शेजवळ, संतोष मगर, मनोज रजाने आणि विजय साठवे या १३ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु आहे.



