लातूर, ता. रेणापूर –
प्रकाशपर्व न्युज पोर्टल
धम्मपाल शिंदे – पुणे व लातूर जिल्हा प्रतिनिधी
राज्य शासनाने हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याची खंत व्यक्त करत रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड (वय ३५) या ओबीसी बांधवाने नदीत उडी मारून आत्महत्या केली. “आता ओबीसींच्या आरक्षणाचं काय?” अशी हताश चिंता व्यक्त करून त्यांनी आपले जीवन संपवले.
या दुःखद घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दूरध्वनीद्वारे कराड कुटुंबियांशी संवाद साधला व त्यांचे सांत्वन केले. या प्रसंगी त्यांनी कुटुंबियांच्या दुःखात आपण वंचित बहुजन आघाडीसह खंबीरपणे सोबत असल्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीचे राज्य सदस्य अमोल लांडगे, रोहित सोमवंशी, रेणापूर तालुकाध्यक्ष आर. के. आचार्य, डॉ. अजनिकर तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांनीही या कठीण प्रसंगी संपूर्ण आघाडी कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

धम्मपाल शिंदे – पुणे व लातूर जिल्हा प्रतिनिधी



