कंधार तालुका प्रतिनिधी – बालाजी सुनील गायकवाड
कंधार तालुक्यातील घागरदरा गावातील सुपुत्र गुणवंत गुट्टे हे परदेशात देशसेवा करून नुकतेच मायभूमीत परतले. त्यांच्या या परताव्यानंतर गावात आणि संपूर्ण कंधार तालुक्यात त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
गावातील नागरिकांनी डीजेच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि महामानवांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून स्वागत सोहळ्याला एक आगळंवेगळं रूप दिलं. गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह लहानथोर सर्वजण या उत्सवात सहभागी झाले होते. गुट्टे यांचं स्वागत ‘सत्कार मूर्ती’ म्हणून करण्यात आलं.
या विशेष स्वागत समारंभाला रोजगार हमी योजनेचे अभियंता दयानंद गडंबे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुणवंत गुट्टे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात गावचे सरपंच, उपसरपंच आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

गुट्टे यांची परदेशात देशासाठी दिलेली सेवा अत्यंत गौरवास्पद असून, अशा व्यक्तींचा गौरव हा समाजाला प्रेरणा देणारा असतो. “जो व्यक्ती परदेशात स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा करतो आणि मायदेशी परततो, तो खऱ्या अर्थाने देशाचा हिरो असतो,” असे भावनिक उद्गार यावेळी काही मान्यवरांनी काढले.
या कार्यक्रमामुळे संपूर्ण घागरदरा गावात आणि परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांनी आपला सुपुत्र परत आल्याचा अभिमानाने आनंद साजरा केला.




