
प्रकाशपर्व न्युज पोर्टल – धम्मपाल शिंदे, पुणे व लातूर जिल्हा प्रतिनिधीनवी दिल्ली : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा शुल्कात मोठी वाढ करण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली असून, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ट्रम्प प्रशासन भारताविरुद्ध ‘मूक युद्ध’ (Silent War) छेडत आहे. या धोरणामुळे भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल कामगारांवर गंभीर परिणाम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यांनी यासंदर्भात अमेरिकेच्या तीन महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख केला –
1. पाकिस्तानला प्राधान्य : भारताला मागे सारून अमेरिकेने पाकिस्तानला महत्त्व दिले असून, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना व्हाइट हाऊसमध्ये भोजनासाठी आमंत्रण देणे हे त्याचे द्योतक असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले.
2. व्यापार शुल्क वाढ : परस्पर व्यापारावर अमेरिकेने ५०% शुल्कवाढ केली असून, यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
3. H1B व्हिसा शुल्कात वाढ : ट्रम्प यांनी H1B व्हिसा अर्जांसाठी तब्बल $1,00,000 (एक लाख अमेरिकन डॉलर) शुल्क आकारण्याच्या घोषणेवर स्वाक्षरी केली आहे.
या निर्णयामुळे अमेरिकेतील भारतीय कुशल कामगारांसाठी अडथळे निर्माण होतील.ट्रम्प प्रशासनाने या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे की, अमेरिकेत येणारे परदेशी लोक खरोखरच अत्यंत कुशल असावेत, तसेच त्यांनी स्थानिक कामगारांची जागा घेऊ नये.
मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्या मते हे पाऊल भारताला लक्ष्य करून उचलले गेले आहे.मोदींवर निशाणा साधताना त्यांनी आरोप केला की, “भारताविरुद्ध सुरू असलेल्या या ‘मूक युद्धा’ला पंतप्रधान मोदी मौन समर्थन देत आहेत.”




