चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी भीमदास नरवाडे

जिवती (चंद्रपूर) : महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या सीमेलगत असलेल्या कोटा परमडोली येथील आदिवासी समाजाचे आराध्य दैवत माता जंगोदेवी देवस्थानाचा विकास अद्यापही खुंटलेलाच आहे. अनेक वर्षांपासून विकास आराखड्याच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात काहीच काम झाले नाही.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा महापुजेच्या दिवशी हजारो भाविक येथे दाखल होणार आहेत. मात्र, देवस्थान परिसरात चिखल, अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहांचा अभाव आणि निवाऱ्याची कमतरता यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अ वर्ग तीर्थक्षेत्राची मागणी
सध्या माता जंगोदेवी देवस्थानाला ‘क वर्ग तीर्थक्षेत्र’ म्हणून मान्यता आहे. मात्र, या देवस्थानाला ‘अ वर्ग तीर्थक्षेत्र’ दर्जा देऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याची मागणी आदिवासी समाजाकडून सातत्याने होत आहे. भक्तनिवास, सभागृह, संरक्षणभिंत, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृहे व रस्ते अशा सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष
स्थानिक आदिवासी समाज व देवस्थान समितीने यासंदर्भात लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदन दिले. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. “विकास आराखड्याच्या मागण्या वर्षानुवर्षे ऐकून घेतल्या जात आहेत; परंतु प्रत्यक्षात काहीच काम होत नाही. त्यामुळे भाविकांना चिखलातच पूजा करावी लागते,” असे देवस्थान समिती सदस्य गजानन पाटील-जुमनाके यांनी सांगितले.



