बुद्धगया येथील महाबोधि महाविहाराच्या संपूर्ण मुक्तीसाठी सुरू असलेले आंदोलन देशभरात तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती धरनास्थळावरील संयोजक मंडळाने दिली आहे. सुप्रीम कोर्टातील 19 जुलै 2025 रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर, मुक्ती मिळेपर्यंत देशव्यापी संघर्ष सातत्याने सुरु राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
संघर्षाची दिशा आणि आगामी कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यासाठी “कोकण प्रादेशिक न्यास” स्थापन करण्यात येणार आहे. या न्यासाच्या माध्यमातून आगामी काळातील सनदशीर आंदोलन अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

संपूर्ण आंदोलनात एकसंघतेने काम होण्यासाठी “विश्वस्त मंडळ” आणि विविध “उप-समित्या” स्थापन करण्याचे नियोजन असून, या संदर्भात रविवार, दि. 22 जून 2025 रोजी, सायंकाळी 4 वाजता एक महत्वाची बैठक बुद्धभूमी फाउंडेशन, अशोक नगर, वालधुनी, कल्याण, जिल्हा ठाणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
भदंत गौतमरत्न महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या बैठकीत विचारांचे आदान-प्रदान, संघटनात्मक निर्णय व आगामी कार्यक्रमांवर चर्चा होणार आहे.

संघर्षाला नवा जोर देण्यासाठी सर्व महाबोधि मुक्ती सैनिकांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.



