खामगाव | शेगावमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादितच्या (म.रा.वि.वि.कं.लि.) खामगाव कार्यालयात लहुजी विद्रोही सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यामध्ये मागणी करण्यात आली की, ज्या पि.डी. (PD – Permanently Disconnected) विज ग्राहकांचे मीटर काढून नेण्यात आले आहेत, त्यांना अर्ध्या रकमेचा भरणा करून पुन्हा नव्याने वीज कनेक्शन दिले जावे.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, काही ग्राहकांचे बिले प्रचंड प्रमाणात आले असून, अशा ग्राहकांना दोन ते तीन टप्प्यांमध्ये बिल भरण्याची सवलत देण्यात यावी. अनेक ग्राहक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने एकरकमी पैसे भरणे त्यांना शक्य होत नाही. तसेच, वीज बिल न भरल्यास लाईट कट केली जात असून, पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्प व बिच्छूंचा धोका वाढतो. त्यामुळे अंधारात एखादी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी वीज वितरण कंपनीवर राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या निवेदनप्रसंगी लहुजी विद्रोही सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. लहुश्री रुपेश भाऊ अवचार, मा. नामदेव अवचार, आकाश गायकवाड, सागर अवसरमोल, निलेश धमेरीया, सचिन अवचार हे उपस्थित होते.
शेगाव प्रतिनिधी – शेख हसन



