रामकिसन अवधूत -प्रतिनिधी
मौजे हरतखेडा, ता. अंबड, जि. जालना येथील ग्रामपंचायतमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा विराजमान न करता हेतूपुरस्सर अभिवादन केले नव्हते. या गंभीर प्रकारामुळे ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकांविरोधात सर्व स्तरातून निषेधाची लाट उसळली आहे.
या प्रकरणाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते व सहशिक्षक अनिल भालेकर यांनी पंचायत समिती अंबड तसेच जिल्हा परिषद जालना येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पंचायत समिती अंबडचे गटविकास अधिकारी यांनी सरपंचांना दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत.

अनिल भालेकर यांनी स्पष्ट केले की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान व शासकीय नियमांची पायमल्ली कदापि सहन केली जाणार नाही.” प्रशासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करून वरिष्ठांकडे दाद मागावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ग्रामसेवक श्री. एस. ए. घुगे यांच्या जाणूनबुजून झालेल्या हलगर्जीपणाबद्दलही तक्रारीत उल्लेख करण्यात आला असून या गंभीर प्रकरणातून भविष्यात कुणीही आपल्या पदाचा गैरवापर करून महापुरुषांचा अवमान करण्यास धजावणार नाही, असा संदेश प्रशासनाने द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

प्रतिनीधी- मकिसन अवधूत



