
प्रकाशपर्वन्युज बीड/ लिंबराज गायकवाड
बीड, १७ सप्टेंबर, २०२५ – मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि महाराष्ट्राला वैचारिक दिशा देणारे थोर समाजसुधारक, पत्रकार, इतिहासकार प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शासकीय तंत्रनिकेतन, बीड येथे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक साडेसात वाजता संस्थेचे माननीय प्राचार्य डॉ. ए. के. वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर, उपस्थितांनी महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करून महाराष्ट्राच्या गौरवाचा जयघोष केला.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रबोधनकार ठाकरे हे केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील म्हणून नव्हे, तर त्यांच्या प्रखर पत्रकारिता, परखड सामाजिक विचार आणि समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर केलेल्या टीकेसाठी ओळखले जातात. ‘प्रबोधन’ नावाचे नियतकालिक काढून त्यांनी महाराष्ट्रातील बहुजन समाजाला जागृत करण्याचे मोठे कार्य केले. त्यांनी हुंडाबंदी, अस्पृश्यता निवारण यांसारख्या चळवळींना पाठिंबा दिला. तसेच, ‘भिक्षुकशाहीचे बंड’ यांसारख्या ग्रंथांतून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि कर्मकांडावर कठोर प्रहार केले. त्यांच्या कार्याचा वारसा आजही महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचा मानला जातो.

आजच्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच संगणक विभागातील कर्मचारी,विद्यार्थ्यांकडून श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते, संस्थेचे सर्व विभागप्रमुख आणि अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले. यामध्ये श्री. बनसोडे यू. व्ही. (विभाग प्रमुख, यंत्र), श्री. गिते बी. एम. (विभाग प्रमुख, विद्युत अभियांत्रिकी), श्री. वीर एस. बी. (विभाग प्रमुख, संगणक अभियांत्रिकी), श्री. गावडे पी. बी. (विभाग प्रमुख, अनुविद्युत), श्री. सोहेल सय्यद (विभाग प्रमुख, स्थापत्य) आणि श्री. अभिजीत जाधव (विभाग प्रमुख, मुद्रण). संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख श्री.थिगळे व्ही.जी, आणि देशमुख.व्ही .एस. यांचा सहभागहोता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिमखाना उपाध्यक्ष श्री. वाघ डी. जी. आणि सहाय्यक श्री. पवार विवेक यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्राम आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली, अशी भावना अनेक उपस्थितांनी व्यक्त केली.



