जालना प्रतिनिधी रामकिसन अवधूत

सुखापूरी, दि. 16 सप्टेंबर : गेल्या तीन दिवसांपासून सुखापूरी मंडळात मुसळधार पाऊस कोसळत असून परिसरात अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली आहे. सुखापूरी, लखमापूरी, कुक्कडगाव, वडिकाळ्या, करंजाळा, रेवलगाव व बेलगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे
या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी मा. उमाकांत पारधी, तहसीलदार मा. विजय चव्हाण, मंडळ अधिकारी मा. व्ही. बी. जायभाये, ग्राम महसूल अधिकारी के. ए. देशमुख व पवन तुपकर यांनी मंडळातील गावांना भेट दिली. त्यांनी वडिकाळ्या गावात ओढ्याचे पाणी शिरल्याची परिस्थिती पाहिली तर करंजाळा येथे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांना धीर दिला.

अधिकाऱ्यांनी नागरिकांना खचून न जाता प्रशासनाकडून शक्य तितकी मदत मिळेल, असे आश्वासन दिले. तसेच सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तातडीने शासनाकडे पाठविला जाईल, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, सुखापूरी तलाव तुडुंब भरल्याने कोणत्याही क्षणी सांडव्याद्वारे पाणी बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नागरिकांनी सजग राहावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे



