
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी भाजप सरकारवर जातीय शुद्धीकरण, सत्य दडपणे आणि न्यायाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. मोदींनी मणिपूरला ‘भारताच्या मुकुटातील रत्न’ म्हटले होते, या विधानाचा त्यांनी ‘क्रूर थट्टा’ असे वर्णन केले आहे.आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ॲड. आंबेडकरांनी मोदींना सात प्रश्न विचारले आहेत. माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर त्यांनी ख्रिश्चन कुकींचे जातीय शुद्धीकरण घडवून आणल्याचा आरोप केला आहे. तसेच, हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार बिरेन सिंगच असल्याचे लीक झालेल्या ऑडिओ टेप्समधून स्पष्ट झाल्याचेही त्यांनी म्हटले.

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे प्रश्न:जर मणिपूर ‘रत्न’ असेल, तर बिरेन सिंग यांच्या सरकारने ख्रिश्चन कुकींचे जातीय शुद्धीकरण का घडवून आणले?ख्रिश्चन कुकींची घरे लुटली जात असताना, जाळली जात असताना आणि हजारो लोक विस्थापित होत असताना, मोदी गप्प का राहिले? महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत असताना पंतप्रधान शांत का होते?हिंसाचाराच्या काळात मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही? ‘रत्न’ रक्तबंबाळ आणि जाळले जात असताना ते इतर राज्यांमध्ये प्रचार का करत होते?मोदी सरकारने मणिपूरमधील सामूहिक हत्याकांड, लैंगिक हिंसाचार आणि जाळपोळीची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्यास नकार का दिला? मोदी कोणते सत्य लपवत आहेत आणि ते कोणाचे रक्षण करत आहेत?आपल्या देखरेखीखाली होत असलेला रक्तपात थांबवण्यासाठी काहीही न करता मोदी मणिपूरला ‘रत्न’ कसे म्हणू शकतात?या प्रश्नांच्या माध्यमातून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारची नैतिकता आणि मणिपूरच्या प्रश्नावरील त्यांची भूमिका यावर जोरदार टीका केली आहे.



